Saturday, June 6, 2015

संवसार तापे तापलो मी देवा



संवसार तापे तापलो मी देवा | करिता या सेवा कुटुंबाची ||
म्हणऊनी तुझे आठविले पाय | ये वो माझे माय पांडुरंगे ||
बहुता जन्मींचा जालो भारवाही | सुटिजे हे नाही वर्म ठावे ||
वेढियेलो चोरी अंतर्बाह्यात्कारी | कणव न करी कोणी माझी ||
बहु पांगविलो बहु नागविलो | बहु दिवस जालो कासाविस ||
तुका म्हणे आता धाव घाल वेगी | ब्रीद तुझे जगी दीनानाथा ||

असे म्हणतात की जेव्हा आपण अगदी मनातुन, तळमळीने, जगाची कास पूर्णपणे सोडुन देवाला हाक मारू तेव्हा देव आपल्याला दर्शन देतो. जोपर्यंत आपण त्याला पूर्णपणे शरण जात नाही, तोपर्यंत दर्शन नाही.
हा तुकारामांचा अभंग हा देवाला तळमळीने हाक मारणारा अभंग आहे.
तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात, या संसारात, आपल्या कुटुंबाची सेवा करता करता खूप कष्ट भोगलेत, संसाराच्या तापात मी तापलोय, होरपळून निघालोय. अाता मी खूप दुःखी आहे आणि मला तुझ्याच दयाळू चरणांची आठवण येत आहे. तू माझी माय आहेस, लेकराचे दुःख बघून क्ृपा करून ये.
कित्येक जन्मांपासून माझे आयुष्य असेच दुःखाचे कष्टाचेच आहे. कुटुंबाचा भार वाहतच कित्येक जन्म गेलेत. यातून कसे सुटावे याची मला कल्पना नाही. मला बाहेरून तसेच मनालाही चोरांनी (दुःखांनी? दुर्गुणांनी?) वेढलेले आहे आणि कोणालाही माझी करुणा येत नाही.
मी खूप वणवण फिरलोय, जनांमध्ये माझा खूप पानउतारा झाला आहे, खूप दिवसांपासून मी असाच कासाविस आहे. तुझ्या दीनानाथ या नावाचे ब्रीद आता तू खरे कर आणि माझ्यासाठी धावून ये.


Tuesday, November 4, 2014

तुका म्हणे विंचु सर्प नारायण, वंदावे दुरोन शिवो नये


हा एक खूपच सुंदर असा अभंग आहे. सामान्य माणसाला अगदी सोप्या शब्दात आणि अत्यंत समर्पक उदाहरणांसह तुकाराम महाराज, अगदी गहन असे सत्य समजावून सांगतात, अवघड प्रसंगातून सुटण्याच्या वाटा दाखवून देतात.

'विष्णुमय जग' असे म्हणल्यावर आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यापैकी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे, जर प्रत्येक माणसात/प्राण्यात विष्णूच आहे, तर प्रत्येक प्राण्याचा आपल्याकडून खूप आदर व्हायला हवा आणि त्याच्याबद्दल प्रेम ही हवं.
पण जेव्हा अवघड लोकं भेटतात आणि अवघड प्रसंग समोर येतात, तेव्हा आपण पूर्णपणे समोरील व्यक्तीचा आदर-प्रेम ठेवू शकत नाही, चिडचिड होते, भीती वाटते (थोडक्यात प्रेम सोडून इतर भावना निर्माण होतात).
अशा लोकांना कसं हाताळायचं ते तुकाराम महाराज पुढील अभंगात सांगतात:

जन देव तरी पाया चि पडावे | त्याचिया स्वभावे चाड नाही ||१||
अग्नीचे सौजन्य शीतनिवारण | पालवी बांधोनि नेता नये ||२||
तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन शिवो नये ||३||

तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येक माणसात देव आहेच, त्यामुळे त्याच्या पाया पडावे, अर्थात त्याचा मनापासून आदर ठेवावा. आणि हे ही जाणून असावे की, स्वभावाला औषध हे नसते. म्हणजेच, प्रत्येक माणसाचा आदर करावा, पण आपल्याला त्याचा स्वभाव पटत नसेल तर फार त्याच्या नादी लागू नये.
तुकाराम महाराज उदाहरणे देतात. ते म्हणतात अग्नीचा स्वभाव हा शीतनिवारणाचा आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण झाडाची नाजूक पालवी अग्नीजवळ नेता तो त्याच्या स्वभावाविपरीत पालवीला काही करणार नाही. पालवी ही अग्नीत दहन होणारच. हा अग्नीचा स्वभावच आहे, त्याचा दोष मात्र नाही. त्यामुळे पालवी ने अग्नीपासून दूर राहणेच बरे.
दुसरे उदाहरणात ते दूर्जनांबद्दल अप्रत्यक्षरित्या बोलतात. ते म्हणतात, जरी विंचू आणि सर्प हे नारायणच आहेत, तरीही आपण त्यांना दुरूनच वंदन करावे, त्यांना शिवू नये. त्याप्रमाणेच दूर्जनही भगवंताचीच रूपे असली तरी आपण त्यांच्यापासून दूर राहणे हेच बरे.

Monday, November 3, 2014

तुका आकाशाएवढा


कार्तिकी एकादशीच्या आजच्या शुभदिनी या ब्लॉगची सुरुवात होत आहे, खुप आनंदाची बाब आहे माझ्यासाठी. राम कृष्ण हरी!

पहिला अभंग, जगप्रसिद्ध 'तुका आकाशाएवढा', पासुन सुरुवात करू :)

अणुरणीयां थोकडा | तुका आकाशाएवढा ||
गिळुनि सांडिले कळिवर | भव भ्रमाचा आकार ||
सांडिली त्रिपुटी | दीप उजळला घटी ||
तुका म्हणे आता | उरलो उपकारापुरता ||

तुकारामांचा हा अभंग म्हणजे त्यांच्या पूर्णत्वाची ग्वाहीच आहे. Enlightenment, ब्रम्हैक्यत्व किंवा जीवन्मुक्तता ही त्यांना प्राप्त झाल्यानंतरचा हा अभंग.

तुकाराम महाराज म्हणतात, 'तुका हा तसे पाहिले तर अणू-रेणुंहुनही छोटा आहे पण आता मात्र तो आकाशाएवढा झाला आहे.' अहं ब्रम्हास्मि या वेदोक्तीचा हा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी विवरण केला आहे.
'देह किंवा कलेवर हे मी त्यागिले आहे कारण मी जाणतो की शरीर म्हणजे माया किंवा भवसागराचा  भाग आहे जो कि फक्त भ्रम आहे'. माझ्या मते याचे तात्पर्य कि, 'शरीर हे नाशवंत माया असल्याचे जाणून मी त्याचा विचार सोडला आहे.'
ज्ञात, ज्ञेय आणि ज्ञान ही जी त्रिपुटी आहे, हा जो फरकाचा भास आहे तो पूर्णपणे विरून गेला आहे. आता ज्ञात, ज्ञेय आणि ज्ञान यांचे एकत्व आहे. हे असे होण्याचे कारण काय? तर आता मनात ज्ञानाचा दीप उजळला आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, आता जीवन्मुक्तता लाभल्यानंतर, मी फक्त उपकारापुरताच उरलो आहे.