हा एक खूपच सुंदर असा अभंग आहे. सामान्य माणसाला अगदी सोप्या शब्दात आणि अत्यंत समर्पक उदाहरणांसह तुकाराम महाराज, अगदी गहन असे सत्य समजावून सांगतात, अवघड प्रसंगातून सुटण्याच्या वाटा दाखवून देतात.
'विष्णुमय जग' असे म्हणल्यावर आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यापैकी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे, जर प्रत्येक माणसात/प्राण्यात विष्णूच आहे, तर प्रत्येक प्राण्याचा आपल्याकडून खूप आदर व्हायला हवा आणि त्याच्याबद्दल प्रेम ही हवं.
पण जेव्हा अवघड लोकं भेटतात आणि अवघड प्रसंग समोर येतात, तेव्हा आपण पूर्णपणे समोरील व्यक्तीचा आदर-प्रेम ठेवू शकत नाही, चिडचिड होते, भीती वाटते (थोडक्यात प्रेम सोडून इतर भावना निर्माण होतात).
अशा लोकांना कसं हाताळायचं ते तुकाराम महाराज पुढील अभंगात सांगतात:
जन देव तरी पाया चि पडावे | त्याचिया स्वभावे चाड नाही ||१||
अग्नीचे सौजन्य शीतनिवारण | पालवी बांधोनि नेता नये ||२||
तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन शिवो नये ||३||
तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येक माणसात देव आहेच, त्यामुळे त्याच्या पाया पडावे, अर्थात त्याचा मनापासून आदर ठेवावा. आणि हे ही जाणून असावे की, स्वभावाला औषध हे नसते. म्हणजेच, प्रत्येक माणसाचा आदर करावा, पण आपल्याला त्याचा स्वभाव पटत नसेल तर फार त्याच्या नादी लागू नये.
तुकाराम महाराज उदाहरणे देतात. ते म्हणतात अग्नीचा स्वभाव हा शीतनिवारणाचा आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण झाडाची नाजूक पालवी अग्नीजवळ नेता तो त्याच्या स्वभावाविपरीत पालवीला काही करणार नाही. पालवी ही अग्नीत दहन होणारच. हा अग्नीचा स्वभावच आहे, त्याचा दोष मात्र नाही. त्यामुळे पालवी ने अग्नीपासून दूर राहणेच बरे.
दुसरे उदाहरणात ते दूर्जनांबद्दल अप्रत्यक्षरित्या बोलतात. ते म्हणतात, जरी विंचू आणि सर्प हे नारायणच आहेत, तरीही आपण त्यांना दुरूनच वंदन करावे, त्यांना शिवू नये. त्याप्रमाणेच दूर्जनही भगवंताचीच रूपे असली तरी आपण त्यांच्यापासून दूर राहणे हेच बरे.
जगद्गुरू तुकाराम महाराज की जय
ReplyDeleteपालवी म्हणजे "झाडाची पालवी" असा त्याचा अर्थ नाहीये तर पालवी म्हणजे पदर किंवा कपडा असा अर्थ तुकोबांना अपेक्षित आहे.. आणि यातून ते म्हणतात की अग्नी कितीही थंडी (शीत) निवारण करत असला तरी तो वस्त्रात बांधून नेता कामा नये नाहीतर अघटित तेच होईल.
ReplyDelete